Blogs

पांढरी कावीळ (हिपॅटायटीस बी): समज आणि गैरसमज

पांढरी कावीळ (हिपॅटायटीस बी): समज आणि गैरसमज
माझ्याकडे बरेच रुग्ण HBsAg reactive असा रिपोर्ट घेऊन येतात. रुग्णांना काहीसुद्धा त्रास नसतो. हि तपासणी हेल्थ कॅम्पस मधे, कॉर्पोरेट चेकअप मधे किंवा ऑपरेशनच्या अगोदर केलेली असते. रुग्ण google वरून ह्याबद्दल वाचतो. इंटरनेट मध्ये यकृत कायस्वरूपी निकामी (cirrhosis) होणार आणि यकृताचा कर्करोग होणार असं काहीतरी वाचतात आणि घाबरून जातात. दुसरीकडे यकृत कायस्वरूपी निकामी झालेल्या रुग्णाची चौकशीअंती असे समजते कि त्यांची तपासणी बऱ्याच वर्षांपूर्वी पॉसिटीव्ह होती. योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुचवून देखील काहींही लक्षण नसल्याने दुर्लक्ष केले गेले असते.
  • तर कुठल्या रुग्णाला उपचारांची गरज आहे ह्याबद्दल आपण माहिती घेऊ.
हिपॅटायटीस बी हा एक प्रकारचा विषाणू आहे. जो यकृताच्या पेश्यामधे जाऊन राहतो आणि इजा करु शकतो. सहसा यकृताचे लक्षणे म्हणजे डोळे पिवळे होणे , पोटात पाणी भरणे इ. खूप वर्षांनी येतात. त्यामुळे ह्या आजाराला पांढरी कावीळ असेही म्हंटले जाते. साधारण पंधरा वर्षांच्या अगोदर ह्या आजारावर फार प्रभावी औषधी उपलब्ध नव्हते. साधारण २००६ सालच्या सुमारास कमी दुष्परिणाम असणारी प्रभावी औषधी उपलब्ध झाली आणि २०११ साली अत्यंत प्रभावी औषध विकसित करण्यात आले. अगदी काही वर्षांपूर्वी कुठल्याही लक्षणे नसलेल्या रुग्णांना कुठलाही औषध न घेण्याचा सल्ला दिला जायचा. पण वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे लक्षण नसणाऱ्या काही विशिष्ट रुग्णांवर उपचार शक्य झाले. अश्या रुग्णांच्या उपचाराने यकृताला होणारी इजा रोखता येणे शक्य झाले.
भारतात हिपॅटायटीस बी चे प्रमाण दर 100000 माणसामागे आठ असे आहे. हे प्रमाण इतर विकसित देशांपेक्षा जास्त आहे. भारतात राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत हिपॅटायटीस बी ची लस देणे २००७ साली सुरु करण्यात आले. म्हणून २००७ च्या अगोदर जन्म झालेल्या व्यक्तींनी जर लस घेतली नसेल तर चाचणी करणे आवश्यक आहे.
  • ह्या विषाणूचा संसर्ग झाल्यास साधारण ५०-७० टक्के रुग्णांना काहीही लक्षणे नसतात. असे १०० रुग्ण असतील तर त्यापैकी ७० ते ८० रुग्णांना सहसा भविष्यामध्ये काही त्रास होण्याची शक्यता कमी असते. उरलेल्या २० ते ३० रुग्णानाच्या यकृताला इजा होउ शकते.
लक्षणांशिवाय देखील विषाणू शरीरात पसरतो आणि यकृताला इजा करतो. अश्या रुग्णांचे यकृत कालांतराने पूर्णपणे निकामी होऊ शकते. यकृताला काही इजा नाही ना? विषाणूचे प्रमाण शरीरात किती प्रमाणात आहे ? ह्यासाठी रक्त , सोनोग्राफी ,फाइब्रोस्कन तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. ह्यामध्ये रुग्णाला औषधांची गरज असल्यास ती दिली जातात. तपासण्यांमध्ये इजेचे निदान आणि तीव्रता ह्यावर देखरेख ठेवता येते. त्यामुळे सर्व रुग्णांचे ३ महिन्याला आणि काही विशिष्ट रुग्णांचे ६ महिन्यांनी तपास केली जातात.
ह्या विषाणूचा संसर्ग शारीरिक संबंधामुळे, दूषित रक्त संक्रमणामुळे आणि गरोदर मातेकडून होणाऱ्या बाळाला होऊ शकतो. घरामध्ये एका व्यक्तीस हा आजार असल्यास इतरांना देखील असू शकतो त्यामुळे घरी सर्वांची HBsAg तपासणी करून घेतली पाहिजे. ज्यांना हा संसर्ग नसेल त्यांना हिपॅटायटीस बी ची लस देण्यात येते जेणेकरून हा आजार त्यांना भविष्यामध्ये होणार नाही. महत्वाचं म्हणजे ह्या आजाराची अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत.
  • आपल्याला एखादा आजार त्याची लक्षणे येण्याअगोदरच जर कळाला आणि त्यामुळे फक्त रुग्णालाच नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला फायदा होत असेल तर ह्यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही. नाही का? म्हणून पांढरी कावीळ ची भीती आणि दुर्लक्ष दोन्हीही टाळा.
२००७ पूर्वी जन्म झालेल्या सर्वानी तपासणी करून लस किंवा औषधांची गरज आहे कि नाही हे जाणून घ्या.
डॉ. सुनील पवार
यकृत आणि जठरांत्र रोग तज्ज्ञ,
पुणा सुपर सस्पेशियालिटी क्लिनिक,
पुणे
९३५६२०७५३६

Share this post